सांगली : शासकीय रूग्णालयांत कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठात्त्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा. तो मंत्रालय स्तरावर सादर करावा. आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 5 हजार 788 एकूण कोरोना बाधीत आहेत. त्यातील 2 हजार 517 उपचाराखाली आहेत. 3 हजार 70 रूग्ण बरे झालेत. महानगरपालिका क्षेत्रात तुलनेने प्रादुर्भाव जास्त आहे. सांगलीत उभारण्यात येत असणारे ऑक्सीजन प्लॅंट व मिरज येथील ऑक्सीजन प्लॅंटची क्षमता वृध्दी याबाबतही चर्चा केली. अधिग्रहित रूग्णालयांमधून रूग्णांकडून जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये, यासाठी प्रत्येक खासगी रूग्णालयांवर शासकीय ऑडीटर नेमून खात्री करावी. रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला असावा. रूग्णाचा मृत्यू झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यात होत असलेला विलंब कमी करावा, असेही त्यांनी आदेश दिले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
from News Story Feeds https://ift.tt/31XyaKP
